Wednesday, August 29, 2018

निष्काम कर्मयोग म्हणजे काय?


सांख्य योग आणि कर्मयोग हे शेवटी एकच आहेत हे म्हणायला सोपे आहे पण समजायला अत्यंत कठीण. कर्मापासून दूर जाणारा सन्यास मार्ग कर्मापासून मुक्ती मिळविण्यासाठी लोक निवडतात. तर कर्मयोगी कर्म सगळी करतो मात्र त्याचे उत्तरदायित्व तो घेत नाही.
मनुष्याच्या मनाला न कळता काही कर्मे घडतात. त्यांची त्याला जाणीव नसल्याने त्या कर्माची बाधा त्याला कदाचित होणार नाही. ही झाली शारीर कर्मे. दुसरा प्रकार आहे ज्यात केवळ मनाच्या जोरावर इंद्रिये भोग भोगल्याचे समाधान मिळवतात. जसे स्वप्नावस्थेत होते. ही आहेत मानस कर्मे. या कर्माचे दायित्व कर्त्याकडे येणार. पण कर्मयोग्याला अहंकार नसल्याने तो या भोगाचाही स्पर्श होऊ देत नाही.
खरा प्रश्न पुढे आहे. कर्म करायचे पण त्याचे बंधन किंवा फळाची अपेक्षा धरायची नाही म्हटले तर चांगली कर्मे करायला सुद्धा इच्छा कशी होणार? त्याला संबोधून ज्ञानेश्वर पुढे म्हणतात, की कर्माची जाणीव होणे हे बुद्धीचे काम आहे. निष्काम मनुष्य इतरांप्रमाणेच बुद्धीचा वापर करून काम जास्तीत जास्त यशस्वी करतो. पण त्याला त्या गोष्टीचा अहंकार नसल्याने त्या कामाचे त्याला बंधन पडत नाही. म्हणजे इतके करूनही त्याच्या निस्पृह आणि निःसंग भावनेमुळे त्याला केलेल्या कर्माचे बंधन उरत नाही.
म्हणजे हे एक प्रकारे संन्यासाच्या बरोबरीचेच झाले. म्हणून सांख्य योग आणि कर्मयोग एकच आहेत.
आता थोडेसे रामदास काय सांगतात पाहू. ते म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे! म्हणजे जो कोणी काही काम करेल त्याला फळ हे मिळणारच. त्यामुळे जितके मोठे प्रयत्न तितके यश. पण काम कोणते असावे? तर जिथे भगवंताचे अधिष्ठान आहे. जे देवाला आवडेल ते काम करावे. म्हणजे ते दीर्घकालीन निष्कलंक यश देते.
ते म्हणतात एखादे मोठे काम हाती घेतले तर ते रामाच्या नावाने रामाच्या साठी करा. यात काय घडते पहा.
रामाच्या नावाने जेव्हा काम सुरु कराल तेव्हा त्यातून कसलेही नकारात्मक हेतू दूर जातील. रामासाठी करताना स्वतःच्या स्वार्थासाठी काही क्षुद्र करावेसे वाटणार नाही. रामाचे काम असल्याने त्यासाठी कोणाकडे जायला, मदत मागायला कमीपणा येण्याचे कारण नसते. राम इतका मोठा आहे की हाती घेतलेल्या कामाला आपली मर्यादा घालण्याची आवश्यकता राहात नाही. यश मिळाले तरी हरकत नाही आणि नाही मिळाले तरी राम ते पाहून घेईल. मी माझ्या बाजूने पूर्ण ताकदीनिशी लढू शकेन.
आता खरोखरच मोठी आणि महान कार्ये अशीच उभी राहतात. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापले कारण ती श्रींची इच्छा होती. त्यांची स्वतःची यावर पूर्ण श्रद्धा होती. आता रामदासांची हीच शिकवण आपण आपल्या व्यावहारिक जगातही तितकीच चपखल बसलेली पाहू शकतो. स्वतः मी कदाचित राख्या विकायला जाणार नाही कारण मला संकोच वाटेल. पण शाळेसाठी जायचे असले तर मग मला लाज कशाला? उलट अभिमान वाटेल. आपल्या कामाच्या जागी, एखादा प्रोजेक्ट करताना जितका तो व्यवस्थापनासाठी करू तितकी त्यात यशाची खात्री जास्त.
म्हणजे आता वर जे म्हटले आहे तसेच काहीसे हे झाले. पूर्ण शक्ती बुद्धीने कर्म केले, पण त्याचे बंधन मात्र स्वतःवर ठेवले नाही.
मला ज्ञानेश्वरी आणि दासबोधाच्या वाचण्यावरून असा बोध झाला खरा!

No comments: